हया अगोदरच्या दोन लेखांमध्ये आपण रीडेव्हलपमेन्टची गरज, येणाऱ्या अडचणी ह्याविषयी माहिती घेतली. तसेच रीडेव्हलपमेन्ट प्रोसेस ची सुरवात कशी करावी ह्याविषयीही माहिती घेतली. आता एकदा आर्किटेक्ट/ सल्लागाराची नेमणूक झाल्यानंतर रिडेव्हलपमेंट प्रोसेस कशी पुढे घेऊन जावी ह्याविषयी माहिती घेऊ.
– आर्किटेक्टने सर्वप्रथम मंजुरीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची छाननी करावी.
– जुन्या सॅनक्शन प्लॅन वरून आणि प्रत्यक्ष मोजणी करून सर्व फ्लॅट्सचा कार्पेट एरिया फायनल करावा. शक्य असल्यास प्लॉट चा एरिया देखील मोजून घ्यावा.
– सर्व सभासदांच्या सूचना आणि अपेक्षा ह्यांची माहिती घ्यावी.
– वरील सर्व माहिती एकत्र केल्यानंतर आर्किटेक्टने 2 महिन्यात महानगरपालिकेच्या बांधकाम नियमानुसार किती बांधकाम शक्य आहे ते चेक करून फिजिबिलीटी रिपोर्ट तयार करावा आणि मॅनेजिंग कमिटीकडे सादर करावा.
– फिजिबिलीटी रिपोर्ट प्राप्त झाल्यावर मॅनेजिंग कमिटी हा रिपोर्ट सर्व सभासदानसमोर मांडण्यासाठी सभा बोलावतील.
– ह्या सभेमध्ये आर्किटेक्ट/सल्लागार उपस्थित राहून सभासदांचे शंकनिरसन करून बहुमताने ह्या रिपोर्टला मान्यता देण्यात यावी.
– रिपोर्टला मान्यता मिळाल्यानंतर टेंडर डॉक्युमेंट तयार करण्याचे काम सुरु होईल.
– सभासदांच्या सूचना, इंटरनल स्पेसिफिकेशन्स, ऍमीमिनिटीज आणि इतर तांत्रिक बाबी निश्चित करून मगच टेंडर डॉक्युमेंट तयार करावे.
– टेंडर भरण्यासाठी सभासद त्यांच्या माहितीच्या नामांकित बिल्डर्सची नावे सुचवतील.
– टेंडर डॉक्युमेंट चा अभ्यास करून भरण्यासाठी बिल्डर्सना पुरेसा वेळ द्यावा.
– टेंडर्स स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी टेंडर भरणाऱ्या बिल्डर्सची संपूर्ण यादी प्रसिद्ध करावी.
– कमीत कमी 3 निविदा येणे आवश्यक आहे, त्यापेक्षा कमी निविदा आल्यास 2 आठवड्यांची मुदतवाढ देता येईल. मात्र अशी मुदतवाढ देऊनही 3 पेक्षा कमी निविदा आल्यास प्राप्त झालेल्या निविदा मंजुरीसाठी ग्राह्य धरण्यात याव्या.
– त्यानंतर 15 दिवसात टेंडर उघडण्यासाठी मॅनेजिंग कमिटीची सभा बोलवावी
– ह्या सभेत सभासद, बिल्डर किंवा त्यांचे प्रतिनिधी हे देखील उपस्थित राहू शकतात.
– ह्या सभेत सर्व टेंडर्स चा तुलनात्मक तक्ता आर्किटेक्ट/सल्लागार तयार करतील.
– टेंडर भरलेल्या बिल्डर्सचे काम आणि गुणवत्ता कमिटीने प्रत्यक्ष जाऊन बघणे श्रेयस्कर.
कमिटी मेम्बर्सनी ह्या सर्व कामात पारदर्शकता ठेवणे कधीही उत्तम, तसेच इतर सभासदांनी देखील कमिटीवर विश्वास ठेवल्यास ही प्रोसेस लवकर मार्गी लागू शकते हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
प्राप्त झालेल्या टेंडर्स मधून योग्य बिल्डरची निवड कशी करावी, काय निकष असावेत ह्याविषयी पुढील भागात पाहू.
मनीष बेदरकर
आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्ट, रिडेव्हलपर
No comments:
Post a Comment