रिडेव्हलपमेन्ट च्या क्षेत्रात काम करत असताना हल्ली एक नवीन ट्रेंड पहायला मिळतो. अनेक सोसायटी संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करून एखादा बिल्डर फायनल करते. बिल्डर सोसायटी बरोबर MOU करतात आणि चालू होते एक वेगळे दुष्टचक्र.
MOU झाला आता लवकरच रीडेव्हलपमेन्टच्या कामाला सुरवात होणार म्हणून रहिवासी खुश असतात पण वेगवेगळी कारणे देऊन बिल्डर काम पुढे ढकलत रहातो.
सोसायटीचे पेपर क्लियर करणे, नवीन बिल्डिंगचा प्लॅन बनवणे, प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे प्लॅनिंग करणे ह्यासाठी MOU केला जातो आणि हया गोष्टी पूर्ण झाल्यावर डेव्हलपमेन्ट अग्रीमेंट केले जाते, परंतु हा मधील कालावधी बिल्डरकडून गरजेपेक्षा अधिक वाढवला जातो. ह्याची अनेक कारणे असतात.
– बिल्डरची इतर चालू असलेली प्रोजेक्ट्स पूर्ण होऊन त्यातील फ्लॅट्स विकल्याशिवाय तुमची बिल्डिंग चालू करणे त्याला शक्य नसते.
– बिल्डरची तुमच्या बाजूला असणाऱ्या सोसायटी बरोबर चर्चा चालू असते, आणि त्याचे प्लॅनिंग दोन्ही बिल्डिंग एकत्रित विकसीत करण्याचे असते.
– बिल्डरकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने आधीची कामे पूर्ण झाल्याशिवाय तुमचे काम चालू करणे त्याला शक्य नसते.
– काही सरकारी नियम बदलणार असल्याची त्याला कुणकुण असते, त्या बदलांचा त्याला फायदा घ्यायचा असतो, म्हणून तो तुमचे काम लांबवतो
– आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला तुमचे काम खरोखर सुरु करण्यात रस नसतो.
काम चालू होत नसल्याने रहिवासी हवालदिल होऊन बिल्डरकडे वारंवार चौकशी करत रहातात परंतु त्यांना फक्त तोंडी आश्वासने मिळतात. शेवटी वैतागून ज्यावेळी रहिवासी MOU रद्द करायचे ठरवतात त्यावेळी बिल्डर त्यांच्याकडे झालेल्या खर्चपोटी जी रक्कम मागतात ती देणे सोसायटीला शक्य नसते आणि वाट पाहणे एवढा एकच पर्याय त्यांच्याकडे उरतो.
हा मनस्ताप टाळण्यासाठी MOU करतांना त्यामध्ये बिल्डरला टाइम लिमिट ठेवा आणि ते न पाळल्यास कोणत्याही मोबदल्या शिवाय MOU रद्द होण्याची तरतूद ठेवा.
रीडेव्हलपमेंट सुरळीत होण्यासाठी परस्पर विश्वासाची गरज आहे परंतु आपण योग्य काळजी घेणे कधीही उत्तम.
Manish Bedarkar
Architect, Project Management Consultant & Redeveloper
No comments:
Post a Comment