लेख क्रमांक 12
रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स साठी काम करत असताना अनेकदा विचित्र परिस्थिती उद्भवतात. सोसायटीतील सर्व मेम्बर्स रीडेव्हलपमेंट साठी तयार असतात, सोसायटीची कागदपत्रे क्लियर असतात पण काही फ्लॅट्सच्या बाबतीत मात्र केस थोडी गुंतागुंतीची असते. ह्यानिमित्ताने नुकतेच आलेले काही अनुभव मुद्दाम शेअर करावेसे वाटतात.
एका सोसायटी मध्ये एका फ्लॅटमध्ये एक अविवाहित महिला रहात होत्या, फ्लॅट हा वडिलांच्या नावावर होता ज्यांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. हया महिलेचे दोन्ही मोठे भाऊ वडिलांच्या निधनाच्या आधीपासून वेगळे रहात होते. वडिलांनी मृत्यूपत्र केले नव्हते. 3 वर्षांपूर्वी आईचेही निधन झाले परंतु आईने मृत्यूपत्र करून स्वतःचा हिस्सा मुलीच्या नावाने केला होता. आईच्या निधनानंतर ही महिला एकटी त्या फ्लॅट मध्ये रहात होती. रीडेव्हलपमेंट होते आहे असे कळल्यावर दोन्ही भावांनी फ्लॅटमध्ये हक्क सांगितला. कायद्यानुसार त्यांना वडिलांच्या मृत्युंनंतर प्रत्येकी 1/4 हिस्सा मिळत देखील होता, परंतु ही महिला पूर्ण फ्लॅटवर हक्क सांगत होती आणि खरे म्हणजे तिच्याकडे वडिलांच्या पश्चात मिळालेला 1/4 हिस्सा आणि आईकडून मृत्यूपत्राद्वारे मिळालेला 1/4 हिस्सा असा अर्धाच हिस्सा होता. सोसायटीच्या दफ्तरी वडिलांच्या मृत्युंनंतर नॉमिनी म्हणून आई आणि तिच्या मृत्युंनंतर ही मुलगी अशी नोंद होती परंतु ही मुलगी नॉमिनेशन ला मालकी हक्क समजत होती. तिची आणि भावांची समजूत काढायचा प्रयत्न केला, परंतु शेवटी प्रकरण कोर्टात गेले आणि रीडेव्हलपमेंट मात्र रखडले.
दुसऱ्या एका प्रकरणात एका गृहस्थांनी आपल्या दुसऱ्या (लग्नाच्या नाही) बायकोला एक फ्लॅट रहायला घेऊन दिला होता. फ्लॅट त्या गृहस्थांच्या नावावर होता. त्यांचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या बायकोने आणि मुलांनी फ्लॅटवर हक्क सांगितला, हया महिलेला कायदेशीर नोटीस दिली, प्रकरण कोर्टात गेले आणि रीडेव्हलपमेंट मात्र रखडली.
एका केस मध्ये तर फ्लॅट ओनर खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे आणि तो इतर कोणाच्या नावे power of attorney पण करून द्यायला तयार नाही.
असे अनेक घोळ असतात. आपण सोसायटी मध्ये रहात असताना आपल्याला काय? म्हणून दुर्लक्ष करतो, पण वेळीच लक्ष न दिल्यास पुढे रीडेव्हलपमेंटच्या वेळी तुम्हाला देखील त्याचा त्रास होऊ शकतो. प्रत्येक फ्लॅट चे टायटल क्लियर असणे ही रीडेव्हलपमेंट मधील महत्वाची गरज असते. त्यामुळे वेळोवेळी चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन हया गोष्टींचा निकाल लावणे सोसायटीसाठी कधीही उत्तम.
मनीष बेदरकर
Architect, Project Management Consultant and Redeveloper